होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्या सणामागे एक आख्यायिका आहे. पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून प्रगट होऊन नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला.
आजच्या विज्ञानाधिष्टित समाजाला अर्थातच ही गोष्ट सहजतेने पटणारी नाही. परंतु सत्यासत्यता बाजूला ठेऊन ह्या गोष्टीतला गर्भितार्थ (मर्म) जाणून घेण्याचा प्रयत्न केला; ह्या गोष्टीकडे केवळ एक रूपक म्हणून बघितले तर काही गोष्टींवर आपण नक्कीच चिंतन करू शकतो. – – माझ्या मनात ‘होलिका’ प्रवृत्ती आहे का? केवळ स्वतःला (आसुरी) आनंद मिळावा म्हणून इतरांना त्रास देण्याचा विचार माझ्या मनात येतो का? तो विचार जर येत असेल तर का येतो आणि मुळात मला माझ्याच नकारात्मक विचारांची जाणीव आहे का? द्वेष, मत्सर, राग, अस्वस्थता, सहन न होणारी चिडचिड अशा भावना मी वारंवार अनुभवतो का?
होलिकेला (प्रह्लादाची आत्या!!) अग्नीचा त्रास होत नव्हता पण शेवटी त्यातच तिचा अंत झाला. जेव्हा एखादी गोष्ट आपण अतिआत्मविश्वासाने करतो, जवळच्या व्यक्तींना, महत्वाच्या वस्तूंना ‘गृहीत’ धरतो; आपल्यातीलच अंगभूत गुणांचा अतिरेक आणि अयोग्य वापर जर केला तर आपलीही अवस्था अशीच काहीशी होते.
प्रह्लादाचा जर विचार केला तर- आपलीच आत्या, आपलेच वडील आणि मृत्यू समोर उभा. तरीही ह्या पठ्याने त्याचे ध्येय (Goal) काही केल्या सोडले नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही मनस्थिती मात्र आपण आपल्या नियंत्रणात ठेवू शकतो (किंवा निदान तसा प्रयत्न तरी नक्कीच करू शकतो). आपण जे करतो आहोत ते योग्य आहे, ते कोणालाही हानिकारक नाही, आणि ते माझ्या कल्याणाचे आहे हा ठाम/ दृढ विश्वास असल्यावर परिस्थितीवर किंवा अन्य कुठल्या व्यक्तीवर बिल फाडण्यात काहीच अर्थ नाही. आपल्या ध्येयासमोर सगळ्या गोष्टी शुल्लक आहेत. जे जे आपल्या नियंत्रणात आहे ते ते अगदी पूर्ण निष्ठेने करणे हे फार महत्वाचे.
तो विष्णू नावाचा देव हिरण्यकश्यपूने होलिकेला कॉल केल्यावर लगेच नाही आला!!! मानसशास्त्र असे सांगते कि नियंत्रणातील घटकांवर काम जर केले तर नियंत्रणाबाहेरील घटक तुलनेने नियंत्रणात येऊ शकतात. प्रह्लादाची ध्येय निष्ठा बघून विष्णूने त्याला मदत केली.
दुर्दैव असे कि आपण मात्र कामाच्या सुरवातीला (काम न करताच) देवाने आमच्यावर कृपा करावी हि अंधश्रद्धा ठेवतो.
त्यामुळे वाईट/अविवेकी विचारांना, अविवेकी भावनांना, ध्येयापासून परावृत्त करणाऱ्या अविवेकी वर्तनाला तिलांजली देऊन होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी (निदान अविवेकी विचार-भावना आणि वर्तन ह्यांची तीव्रता, वारंवारिता आणि कालावधी कमी होईल ह्यासाठी मनापासून प्रयत्न करणे) हाच होळी सण साजरे करण्यामागचा उद्देश आहे. आजच्या ह्या दिवसापासून वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करूया जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे आणि आनंदाचे जाईल.
-प्रा. तन्मय लक्ष्मीकांत जोशी (९८९०६१४६६७)
Tags: होळी सण