साधारणपणे, ३ आठवड्यापूर्वी एक फोन आला. जानेवारी २०२१ मध्ये एक काकू, घरामध्ये काम करताना पाय घसरून अचानक पडल्या. काकांची तब्येत आणि वय , तसेच दोघी मुली विवाहित त्यामुळे घरी व्यवस्थित काळजी घेता येणे शक्य नसल्याने ह्या काकूंना एका वृद्धाश्रमात ठेवले. मोठी मुलगी पुण्यात आणि धाकटी नाशिक मध्येच असल्याने ती नियमितपणे सासरकडच्या सगळ्या जवाबदाऱ्या आणि स्वतःची नोकरी तसेच २ वर्षाची मुलगी सांभाळून आई कडे लक्ष देत असे – वृद्धाश्रमात येऊन काय हव नको ते बघत आणि डॉक्टरांकडेही नियमित चौकशी करत असे. परंतु, तब्येतीला फारसा प्रतिसाद नव्हता; त्यातच भर म्हणून ६-८ महिन्यापूर्वी ह्या काकूंना पॅरालिसिस चा अटॅक येऊन गेला आणि हातापायांची हालचाल- तसेच बोलणे एकदम थांबून गेले. संबंधित डॉक्टरांनी असे सांगितले कि ह्यांना समुपदेशनाची गरज आहे.
त्यामुळे, धाकट्या मुलीने संपर्क साधला असता त्यांच्या सोबत जाऊन वृद्धाश्रमात त्या काकूंना भेटलो. परंतु, जेमतेम १-२ असंबद्ध शब्दांच्या पलीकडे त्या काहीच बोलत नव्हत्या. डॉक्टरांच्या उपचारांना अत्यंत अल्प प्रतिसाद, शरीराची अत्यंत मर्यादित अशी हालचाल, प्रचंड सूज शिवाय कॅथ्रेड लावलेले अशा अवस्थेत काय समुपदेशन करणार???……
तेव्हा, समुपदेशनाचा मूळ गाभा कामी आला – केवळ ऐकणे!! हि धाकटी मुलगी आई बद्दल अत्यंत अगतिकतेने, भरभरून बोलत होती. आईची सगळी case history सांगत होती. तसेच, त्या वृद्धाश्रमातील आजूबाजूच्या काही आजी ह्या काकूंबद्दल सांगत होत्या- रात्री अपरात्री काय बोलतात – कसं बोलतात हे सगळं सांगत होत्या. साधारणपणे दीड तास हे सगळं ऐकून घेतल्यावर धाकट्या मुलीशी चर्चा करत असतांना – ती मुलगी स्वतःहून म्हणाली- “अशा अवस्थेत सुट्टीच्या दिवशी आईला घरी नेलं तर चालेल का?” तुम्ही काय सांगाल?”………त्यावर आम्ही एकत्रितपणे—घरी नेलं तर आणि नाही नेलं तर असे दोन्ही पर्याय detail explore केले आणि मग तीच म्हणाली, मी आईला घरी नेते – त्यावर पुन्हा– एक दिवस घरी नेऊन आणल्यानंतर; पुन्हा वृद्धाश्रमात आणल्यावर त्यां काकूंची प्रतिक्रिया काय असेल, ह्याचा अंदाज कसा घेता येईल हे सुद्धा सविस्तर discuss केलं. ज्या जमेच्या गोष्टी होत्या त्यांना support केला आणि संभाव्य धोक्यांचीही कल्पना त्यांना दिली.
त्या मुलीने जिद्दीने आईला घरी नेले आणि शक्य तितके सगळे प्रयत्न करून आईला एका वेगळ्या सकारात्मक वातावरणात आणले.
आज ३ रविवार झाले, त्या काकू आणि त्यांचे शरीर आता उपचारांना खूप चांगला प्रतिसाद देतात, बोलण्यामध्ये खूप सुधारणा आहे आणि हातापायांची हालचाल देखील भरपूर वाढली आहे. प्रचंड फास्ट अशी रिकव्हरी आहे. जी गोष्ट वर्षभरात ऍडमिट करून झाली नाही ती गोष्ट केवळ ३ रविवार मध्ये कशी काय झाली?? हा त्या मुलीला पडलेला प्रश्न!!
आजाराचे योग्य निदान आणि त्यावर योग्य तो उपचार (काही वेळेस केवळ ऐकून घेऊन समोरच्या व्यक्तीला योग्य त्या दिशेने प्रोत्साहन देणं हा देखील उपचाराचाच भाग असतो; त्यासाठी वेगळं असं काही “टेक्निक” नसतं) हे महत्वाचं असतं.
समोरच्या व्यक्तीचा विचार जेव्हा आपण त्या व्यक्तीच्या भूमिकेतून करू लागतो तेव्हाच ती व्यक्ती खऱ्या अर्थाने आपल्याला समजते. त्या काकूंना असं अचानक वृद्धाश्रमात आणणं हे पटलं नव्हतं. पॅरालिसिसचा अटॅक येण्यापूर्वी, त्या, वृद्धाश्रमात रात्रीअपरात्री त्यांच्या घरातील काही गोष्टी बोलून दाखवत असे, त्यांना काकांची आठवण येत असे आणि इतर अन्य काही संदर्भ पुढे घेऊनच त्यांना टप्प्याटप्प्याने घरी नेण्याचा विचार आमच्या चर्चेमध्ये झाला. अर्थातच, ह्या सगळ्याचे श्रेय त्या धाकट्या मुलीला आणि तिला साथ देणाऱ्या तिच्या सासरच्या कुटुंबियांचेही. त्यांनी प्रयत्न केले म्हणून काकू आज दीर्घ आजारपणतून बाहेर येत आहे. आणि जो विषय शिकलो त्याचा एखाद्या कुटुंबाला असा उपयोग होतो हे बघून मिळणारे समाधान शब्दांच्या पलीकडचे आहे.
प्रा. तन्मय लक्ष्मीकांत जोशी
मो- 9890614667