सुप्रिया (नाव बदललेले), २६ वर्षीय नामांकित ITI कंपनीत काम करणारी तरुण मुलगी. मागील दोन वर्षांपासून एकूणच जीवनशैलीत झालेला बदल, चारचौघांमध्ये जाण्याची भीती, सतत नकारात्मकता, गतजीवनातील काही मार्मिक प्रसंगांची सातत्याने आठवण, इत्यादी समस्यांसाठी तिने प्रार्थमिक चर्चा केली. पुण्यातील एका डॉक्टरांकडे उपचार चालू होते. रोर्शाक, एम एम पी आय आणि अन्य ४-५ चाचण्या, त्यांचे ऑनलाईन रिपोर्ट्स पाठविले. परंतु, तरीही “गुण” नव्हता.
समुपदेशनाचा भाग म्हणून त्यांना सांगितले कि, पहिल्यांदा चर्चा करू त्यानंतर ठरविता येईल कि नेमके काय आणि कसे पुढे जाता येईल. ती मुलगी पुण्यातील असल्याने अर्थातच सेशन झूम वर झाले. पहिले सेशन साधारण एक ते सव्वा तास चालले. तिचे नेमके म्हणणे काय आहे हे ऐकून घेतल्यावर काही ठळक मुद्दे समोर आले. तिची विचारसरणी- “माझ्याच बाबतीत असं का झालं?” आजारपणामध्ये भेटायला येणाऱ्या लोकांच्या “अनाठायी ऐकीव” गोष्टींवर विश्वास ठेवून नोकरीची उगाचच भीती आणि काळजी करणे. “शारीरिकतेबद्दल लोकं माझ्याविषयी काय विचार करत” असतील ह्याची अवास्तव चिंता इत्यादी. तसेच, ‘लहानपणी झालेल्या काही घटनांचा आजही होणारा मानसिक त्रास’.
समुपदेशनाच्या सत्रामध्ये सहभागी होण्याची तिची इच्छा, सत्रामध्ये तयार होत गेलेला रॅपो, पद्धतशीर वापरली गेलेली तंत्रे (रॉजेरियन आणि REBT), आणि महाविद्यालयातील डायगोनस्टिकच्या पेपरचा अनुभव ह्यावर हे निश्चित झाले होते कि, हा भाग पूर्णपणे बरा होणारा आहे आणि केवळ विचारांमध्ये विवेकपूर्ण बदल आवश्यक आहेत. विवेकी विचारांचे निकष, त्याला जोडून सॉक्रेटीक डायलॉग मेथड, चेजिंग द लँगव्हेज, रॅशनल इमोटीव्ह इमेजिरी,REBT सेल्फ मॅनॅजमेण्ट प्रिंसिपल्स आणि रॉजेरियन पद्धतीवर आधारित इगन मॉडेल ह्यांचा वापर प्रामुख्याने केला गेला. डॉ. प्रशांथम सरांच्या पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल ग्रोथ ह्या त्रिसूत्रीवर भर देत तसेच एलिस-फडके REBT चे मूळ वापरत पुढील तीन सेशन्समध्ये टप्प्या टप्प्याने विस्तृत चर्चा झाली. त्यापैकी एक सेशन इन-पर्सन झाले.
ह्या सेशन्समुळे तिच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या, जीवनाकडे बघण्याचा एक आनंदी आणि विवेकी दृष्टिकोन तिला सापडला आणि स्वतःबद्दलचा आत्मविश्वास गवसला.
मानसशास्त्राच्या आणि समुपदेशनाच्या अभ्यासाच्या दृष्टीने जाणवलेल्या काही महत्वाच्या गोष्टी-
१) वेल्लोरच्या डॉ. प्रशांथम सरांची दोन वाक्य येथे खूप लागू झाली. अ) असे ऐका कि समोरच्याला तुमच्याशी बोलावेसे वाटेल ब) असे बोला कि समोरच्याला तुमचे ऐकावेसे वाटेल.
२) रॉजर जसे म्हणतो- व्यक्ती स्वतःची मदत स्वतः करण्यास सक्षम असतो. एक समुपदेशक म्हणून आपले काम म्हणजे त्या व्यक्तीला तिच्या क्षमतांची जाणीव होईल असे ‘मानसिक वातावरण तयार करणे’.
३) एलिस म्हणतो तसे- घटनांमुळे किंवा व्यक्तींमुळे आपण अस्वस्थ होतो असे नाही तर त्याकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे त्यामुळे आपण अस्वस्थ होत असतो. जर दृष्टिकोन बदलला तर परिस्थिती न बदलता आपण स्वस्थ/समाधानी होऊ शकतो.
४) मानसिकतेचे निदान(diagnosis) जर योग्य असेल आणि समुपदेशनाच्या तंत्रांचा योग्य वापर केला गेला तर गोळ्या-औषधांपेक्षा केवळ चर्चेतून/ संवादातून मानसिक समस्या सोडविल्या जाऊ शकतात.
५) समुपदेशनातून बाह्यगोष्टींवरची डिपेंडन्सी कमी होऊन मानसिक आत्मविश्वास निर्माण होतो जो भविष्यातही उपयोगी पडतो.
(अर्थात, काही मानसिक आजारांसाठी गोळ्या-औषधे आवश्यक असतात.)
प्रा. तन्मय लक्ष्मीकांत जोशी
M: 9890614667
https://www.chaitanyapsychology.com