आज दिव्यांची आमावस्या. काही जणांसाठी ती ‘गटारी’ आमावस्या. प्रश्न पडला कि आपल्या परंपरेमध्ये दिव्यांचे असे काय महत्व आहे कि जेणे करून त्यांची पूजा केली जाते? आणि ती सुद्धा आमावस्येला ! हे केवळ धार्मिकता म्हणून आहे? श्रद्धा म्हणून आहे?? कि एखादे तत्त्वचिंतन आहे?
मानसशास्त्राचा अभ्यासक म्हणून जे सुचलं ते मांडायचा प्रयत्न करतोय.
अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी “दिवे” सहाय्य्यभुत ठरतात. त्या ज्ञानमय दिव्याची प्रतीकात्मक (symbolic) आणि कृतज्ञतापूर्वक पूजा (Gratitude) म्हणून दीपपूजन. हि झाली रूढी किंवा परंपरेचा भाग. परंतु हेच तत्व आपल्या सध्याच्या मानसिकतेलाही लागू आहेच कि!!
स्पर्धात्मक वातावरण, असमान आणि अस्थिर अशी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती, नात्यांमधील वाढता विसंवाद, अपेक्षाभंग, व्यसनाधीनता, ध्येयविरहित जीवन शारीरिक व्याधी आणि ह्या सगळ्याला पूरक म्हणजे रोजचा ताण-तणाव. त्यातच, सगळे असून नसलेपणाची जाणीव म्हणजे असमाधान. हे असमाधानच मानसिक अंधःकाराला कारणीभूत ठरते.
पॉल एकमन ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनीं अगदी सुरवातीला सहा मूलभूत भावनांविषयी भाष्य केले. त्या सहापैकी क्रोध, दुःख आणि भीती ह्या तीन नकारात्मक भावना असून ह्यालाच भारतीय तत्वज्ञानामध्ये ‘विकार’ संबोधले आहे. जेव्हा आपण ह्या विकारांच्या अधीन होतो तेव्हा परिणामी आपल्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होऊन ‘मानसिक अंधःकार’ अधिक तीव्र होत जातो.
जेव्हा व्यक्ती अशा अंधःकारात अडकतो तेव्हा ऍरॉन बेकच्या ‘बोधात्मक त्रिकोणात’ सापडतो ( Cognitive Triad- Hopelessness, Helplessness, Worthlessness).
ह्या मानसिक अंधःकारातून बाहेर पडण्यासाठी काही मानसोपचार तंत्रे आपल्याला नक्की मदत करू शकतात. ही मानसोपचार तंत्रे म्हणजे एकप्रकारे ज्ञानमय दिवेच आहेत!!
1) Johari Window च्या मदतीने आपण स्वतःला नव्याने ओळखून घेऊ शकतो. मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षक, परिचयाचे समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ ह्यांच्याशी चर्चा करून (Unknow to self and unknown to others) हि window आपल्याला बऱ्याच प्रमाणात ओपन करता येईल. त्यामुळे ‘स्व’ची जाणिव होईल.
2) कामाचा कंटाळा येतो म्हणून काम सोडणे हा पर्याय नाही पण तेच काम आपण जर वेगळ्या पद्धतीने केले तर कामातील नाविन्यता टिकून राहते. गीतेत “योगः कर्मसु कौशलम” असे म्हटले आहे म्हणजेच कौशल्यपूर्वक जर काम केले तर आपल्यालाही त्या कामाचा आनंद घेता येतो.
3) डॅनियल गोलमन ह्यांच्या “Emotional Intelligence” ह्या पुस्तकात अगदी सुरवातीला ऍरिस्टोटलचे एक फार सुंदर वाक्य आहे: “राग कोणालाही येऊ शकतो- ते अगदी सोपे आहे. परंतु, योग्य व्यक्तीवर योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या वेळी, योग्य कारणासाठी आणि योग्य पद्धतीने रागावणे हे मात्र तितकेसे सोपे नाही”.
म्हणजेच काय, तर रागासारखी नकारात्मक भावना जरी असली तरीही त्या भावनेचे जर आपण नियंत्रणापेक्षा नियमन करण्याचा सराव केला तर आपल्याला “मानसिक उर्जारूपी प्रकाशाचा” मार्ग दिसू शकेल.
4) दिवा लावल्यावर त्याला पुरेसे तेल घालणे, वातीची काजळी योग्य वेळी काढणे, वारा लागणार नाही ह्याकडे लक्ष देणे अशा अनेक प्रकारे काळजी घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे, कौटुंबिक आधार हा व्यक्तीसाठी महत्वाचा आहे. कौटुंबिक आधार जर असेल तर व्यक्तीला अंधःकारातून बाहेर यायला खूप लवकर मदत होते.
5) ज्याप्रमाणे उंबरठयावर लावलेला दिवा हा बाहेरील आणि आतील दोन्ही जागा प्रकाशमान करतो तव्दतच विवेकी विचार आणि त्याला अनुसरून आचरण रुपी दिवा आपण कायम तेवत ठेवला तर त्यामुळे आपले स्वतःचे आणि इतरांचेही जीवन प्रकाशमान होण्यास मदत होते.
अर्थात, ह्या सर्व गोष्टी कायमच आणि अगदी परिपूर्णपणे जमतील असेही नाही पण ह्या तंत्रांचा किमान सराव केला तर अंधःकार कमी होऊन आपल्याला पुढची वाट नक्कीच दिसू शकेल.
जर असा सराव असेल तर आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे “प्रसन्नात्मनेंद्रीयमन:” किंवा तुकाराम महाराज म्हणतात तसे “मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण!!” ह्याची प्रचिती आपल्याला नक्कीच येईल.
दीप आमावास्येकडून प्रेरित होत मनातील अंधःकार दूर करूया आणि शरीराच्या तसेच मनाच्या शुचिर्भूततेला कारणीभूत ठरणाऱ्या “श्रावणात” सकारात्मक विचारांचे “श्रवण” होवो ही सदिच्छा.
प्रा. तन्मय लक्ष्मीकांत जोशी
मो: ९८९०६१४६६७
Tags: दिव्यांची आमावस्या