प्रख्यात विचारवंत आणि तत्वज्ञानी ‘ऍरिस्टोटल’ ह्यांनी असे म्हंटले आहे की- “राग कोणालाही येऊ शकतो. राग येणे हे सोपे आहे पण, योग्य त्या व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य त्या वेळी, योग्य हेतूने आणि योग्य त्या पद्धतीने रागावणे हे मात्र तितकेसे सोपे नाही“. म्हणूनच भावनिक सजगतेचे ‘नात्यांच्या व्यवस्थापनामध्ये’ खूप महत्व आहे.
वैवाहिक जीवन सुखी व्हावयाचे असेल तर वैवाहिक जीवनात पतीपत्नींनी एकमेकांना आधारभूत होईल असे, सुखकारक, समाधानकारक अनुभव येतील असे वर्तन केले पाहिजे व त्यासाठी पतीपत्नींनी भावनिक परिपक्वतेची विशिष्ठ पातळी गाठली पाहिजे. कोणत्या वर्तनाने वैवाहिक जीवनात ताण-तणाव निर्माण होतो ह्याची किंवा कोणत्या वर्तनाने एकमेकांना आनंद मिळेल ह्याची जाणीव दोघांनाही असली पाहिजे.
भावनिक परिपक्वता म्हणजे भावनांचे पूर्ण नियंत्रण करून भावना प्रकारचं होऊ न देणे असे नव्हे, तर प्रचलित सामाजिक मानदंडानुसार एखाद्या व्यक्तीच्या ज्या भावना प्रकट होतात त्यांच्याशी समरस होणे व त्यांचा आदर करणे होय. भावनिक नियंत्रणापेक्षा भावनिक नियमाला जास्त महत्व आहे. आणि सुखी-समाधानी वैवाहिक जीवनामध्ये भावनिक नियमन हे अत्यंत आवश्यक आहे. भावनिक नियमन हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आपल्या भावनांविषयी अधिक सजग असू.
अनेकदा असे दिसून आले आहे कि, जोडप्यांमधील वादविवादाला अन्य तिसरी व्यक्ती किंवा बाहेरील कुठला प्रसंग कारणीभूत नसतो तर त्या जोडप्यातील भावनिक अपरिपक्वता हीच कारणीभूत असते.
भावनिकदृष्ट्या सजग असणे म्हणजे जीवनातील अनेक प्रसंगांना केवळ भावनिक होऊन प्रतिक्रिया न देता ती परिस्थिती हाताळतांना बुद्धी, विवेक, होणारे परिणाम ह्या सगळ्यांचा सर्वांगीण विचार करून वर्तन करणे. म्हणून परिस्थिती हाताळतांना भावनांच्या आहारी न जाता बुद्धी आणि विवेक यांचा वापर करणे म्हणजे भावनिकदृष्ट्या सजग असणे होय.
आपल्या भावनांचा आपल्या शरीरावर देखील परिणाम होत असतो. शरीरांतर्गत होणारे बदल हे समजून घेणे, त्या बदलांची जाणीव असणे हे भावनिक सजगतेचे दुसरे वैशिष्ठ्य आहे. भावनिक अस्वस्थतेमुळे डोकेदुखी, रक्तदाब वाढणे इत्यादी शारीरिक समस्या उद्भवतात. भावनिकदृष्ट्या सजग असलेली व्यक्ती ह्या शारीरिक बदलांविषयी देखील जागरूक असते, परिणामी अश्या व्यक्तीचे स्वतःच्या शरीरावर देखील नियंत्रण असते. मात्र, जे भावनिकदृष्ट्या सजग नसतात त्यांच्या नात्यांमध्ये वारंवार ‘कलहाचे’ प्रसंग येतात आणि त्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होतो.
केवळ आपल्याच नाही तर आपल्या जोडीदाराच्या भावनांकडे लक्ष देणे, जोडीदाराच्या भावना ओळखणे, आणि त्या समजून घेणे हे फार गरजेचे आहे. आवाजातील चढ-उतार, उच्चार, भाषाशैली, नजर, एकंदर देहबोली अश्या अनेक माध्यमातून आपला जोडीदार कोणती भावना अनुभवत आहे किंवा व्यक्त करत आहे ह्याविषयी आपल्याला समजू शकते. एखाद्या गंभीर किंवा नाजूक प्रसंगावर आपल्या जोडीदाराशी बोलताना, त्याला/ तिला विश्वासात घेऊन चर्चा करणे हेसुद्धा भावनिक सजगतेचे लक्षण आहे. इतकेच नव्हे तर प्रसंगी कौशल्याने विनोद निर्माण करून परिस्थितील किंवा गंभीर वातावरणातील ताण दूर करणे हे भावनिकदृष्ट्या सजग आणि परिपक्व व्यक्तीचे लक्षण मानले जाते.
- मैत्री, प्रेमपूर्ण जवळीकता
जेव्हा दोन व्यक्तींमध्ये एकमेकांच्या आवडी-निवडी, स्वभाव, छंद तसेच इतर अनेक गोष्टींवर अगदी सहजरित्या संवाद सुरु होतो तेव्हा त्या दोन व्यक्तींमध्ये ‘मैत्रीची’ भावना वाढीस लागते. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, एकमेकांना आधार देणे, समजून घेणे असे अनेक मैत्रीचे पैलू आहेत. कधी कणखरपणे तर कधी सौम्यपणे, कौशल्याने आपल्या मित्राला न दुखावता त्याची चूक दाखवणे. ‘आपण जे सांगतो आहोत ते त्याच्या हितासाठी आहे हि भावना व्यक्त होणे हे फार महत्वाचे आहे. अशी मैत्री शालेय, महाविद्यालयीन जीवनातील मैत्री, तसेच आपण जेथे काम करतो तेथील मैत्री, सार्वजनिक जीवनातील मैत्री तसेच जोडीदाराशी असेलेले मैत्रीचे नातेदेखील तितकेच महत्वाचे आहे.
वैवाहिक जीवनाचा विचार करता जोडीदारांमध्ये मैत्रीपूर्ण नाते असणे फार आवश्यक आहे. प्रेम या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. तसेच प्रेमाच्या अनेक छटा आहेत. आईचे मुलांवरील प्रेम, पतिपत्नींचे एकमेकांमधील प्रेम, बहीण-भावंडांचे प्रेम, माणसाचे प्राणिमात्रांवरील प्रेम इत्यादी अनेक निरनिराळ्या अर्थांनी प्रेम हि संकल्पना वापरली जाते. गुणात्मकरीत्या प्रत्येकाचे एकमेकांशी असलेले प्रेमाचे नाते हे वेगवेगळे असते.
सध्याच्या तरुण पिढीला जर आपण विचारले कि प्रेम म्हणजे काय तर त्यांच उत्तर- “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमच ‘सेम’ असतं!!” किती वेळा फोने केले, किती महागडं गिफ्ट दिलं किंवा घेतलं, सोशल मीडियावर कसे फोटो पोस्ट केले, फिरायला कुठे गेलो इत्यादी बाह्य आणि दिखाऊ गोष्टींमध्ये सध्या बहुताऊंशी तरुण पिढीच्या प्रेमाच्या संकल्पना आहेत.
रॉबर्ट स्टर्नबर्ग ह्यांनी सामाजिक मानसशास्त्रामध्ये “प्रेम” ह्या संकल्पनेवर संशोधन केले आहे. त्यांच्या मते, प्रेमाला तीन महत्वाच्या बाजू असतात. त्यापैकी एक म्हणजे आवड. आवड म्हणजे एकमेकांना वाटणारे आकर्षण किंवा ओढ. त्या व्यक्तीला बघितले कि आपल्याला फार बरे वाटते. त्या व्यक्तीकडे आपण केवळ बघत राहावे, न्याहाळत राहावे. त्या व्यक्तीच्या आजूबाजूला राहावेसे वाटत असते. सारखा त्याच एका व्यक्तीचा ध्यास आपल्याला असतो. आपण त्या एकाच व्यक्तीसाठी आहोत आणि ती व्यक्ती हेच आपले सर्वस्व आहे अशी आपली ठाम भूमिका असते. त्या व्यक्तीच्या हरेक बारीक सारीक गोष्टींकडे नकळत आपले लक्ष जाते. त्या व्यक्तीच्या सगळ्याच गोष्टी आपल्यालादेखील आवडू लागतात.
दुसरी बाजू म्हणजे जवळीकता. ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे असे आपण म्हणतो त्या व्यक्तीच्या अधिक जवळ जायचा आपण प्रयत्न करत असतो. त्या व्यक्तीचे वागणे-बोलणे, त्या वक्तीच्या सवयी, त्या व्यक्तीचा स्पर्श आपल्याला सारखा हवाहवासा वाटत असतो. त्या एका व्यक्तीशिवाय आपल्या अन्य काहीही सुचत नाही आणि दिसत नाही. कुठलेतरी कारण काढून सतत त्याच एका व्यक्तीच्या जवळ किंवा त्या व्यक्तीच्या सोबत राहण्याचा प्रयत्न असतो. त्या व्यक्तीच्या जवळ राहावे असे सारखे वाटत असते. ती व्यक्ती जर दिसली नाही तर अगदी अस्वस्थ व्हायला होते. त्या एका व्यक्तीशिवाय जगण्याला अर्थच नाही अशी भावना निर्माण होते.
तिसरी महत्वाची बाजू म्हणजे “नात्यामधली एकमेकांविषयी असलेली आणि जपलेली बांधिलकी”. प्रेमाच्या वरील दोन बाजूंपेक्षा हि तिसरी बाजू अधिक परिपक्व आणि विकसित असते असे स्टर्नबर्ग ह्यांनी सांगितले. प्रेमाविषयी बोलताना असं म्हटलं जातं कि सहवासाने प्रेम वाढतं. जितका अधिक काळ आपण आपल्या जोडीदारासोबत राहू तितका अधिक आपल्याला आपल्या जोडीदाराचा ‘स्वभाव, विचार, बोलायची-वागण्याची पद्धत, सवयी, आवडी-निवडी’ इत्यादी अनेक गोष्टी समजत जातात. अर्थात, हा सहवास केवळ शरीराचाच असावा असे नाही, तर मनाने सुद्धा आपण आपल्या जोडीदारासोबत असणे आवश्यक आहे. एकमेकांकडे केवळ नवरा-बायको ह्या नजरेने न बघता “मित्रत्वाच्या” नजरेने जर आपण बघू शकलो तर ते वैवाहिक नाते अधिक खुलून येते, समृद्ध होते. शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात आपण जशी मैत्री करतो (त्याचा किंवा तिचा स्वभाव जसा असेल तसा स्वीकारतो, आपला हट्ट बाजूला ठेवतो, प्रसंगी आपल्याकडून काही चुकल्यास अगदी मोकळेपणाने कबुल करतो, त्याची/तिची चूक असल्यास खुल्या दिलाने आपण स्वीकारतो, एकमेकांची काळजी घेतो आणि आवश्यक असेल तर एकांतात; सगळ्यांसमोर नव्हे, कानउघाडणी देखील करतो, पुन्हा नव्याने आनंदाने आपण आपली सोबत कायम ठेवतो) अगदी त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात देखील जोडीदाराशी मित्रत्वाचे नाते जर असेल तर ते वैवाहिक नाते अधिक समृद्ध होते आणि आनंदी व समाधानी नात्याचा अनुभव आपण घेऊ शकतो.
आपल्या प्रिय व्यक्तीचा स्पर्श, सहवास, आवडी-निवडी, चुका इत्यादी अनेक गोष्टींकडे अधिक परिपक्व आणि समजूतदारपणे बघणे, स्वतःला आणि आपल्या जोडीदाराला विनाअट स्वीकारणे हीच खरी प्रेमाची सर्वोच्च पायरी किंवा भक्कम बाजू आहे असे म्हणता येईल.
प्रा. तन्मय लक्ष्मीकांत जोशी
-9890614667
One Reply to “वैवाहिक जीवनातील भावनिक सजगतेचे महत्व”
खुप छान
सर काल आपण बोललो खरच मला परीवर्तन जाणवलं
मला माझी जबाबदारी कळली
माझी चुक आणि स्वभावदोष पण लक्षात आलं